इंधनांच्या दरात झालेली वाढ, पशुखाद्यांच्या वाढत्या दरामुळे दूध उत्पादक शेतकरी अत्यंत अडचणीत आला आहे. त्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने दिनांक 31 जुलैच्या मध्यरात्रीपासून 3.5 फॅट व 8.5 एसएनएफच्या गाय दुधाच्या दरात प्रतिलिटरला एक रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला असून शेतकर्यांना किंचित दिलासा मिळाला आहे. गाय दूध खरेदी प्रतिलिटरला 32 रुपये दराने होत होती, ती आता 33 रुपये दराने होईल.
दरम्यान, वरकड खर्चासह दूध संस्थांसाठी गाय दूध खरेदी ही प्रतिलिटरला 33 रुपये 80 दर राहील, अशी माहिती कात्रज दूध संघाचे व्यवस्थापकीय संचालक मनोज लिमये यांनी दिली. वाढीव दरामुळे जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकरी व दूध संस्थांनी संघास स्वच्छ, ताज्या व भेसळविरहित उच्चतम गुणप्रतीच्या दुधाचा जास्तीत-जास्त पुरवठा करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
दूध उत्पादनात घट झालेली असून उत्पादन खर्चातील वाढीमुळे अडचणीतील शेतकर्यांना मदत करण्याच्या हेतूने संघाने दूध खरेदी दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे संघाला अतिरिक्त बोजा येणार आहे. मात्र, दुधाच्या खरेदी दरात वाढ करण्यात आलेली असली तरी ग्राहकांसाठीच्या विक्री दरात कोणतीही वाढ करण्यात आलेली नसल्याचे सांगितले आहे.
