अंगारकी संकष्टी चतुर्थी 2025 (Angaraki Sankashti Chaturthi 2025) तारीख, वेळ, पूजा विधी आणि पौराणिक कथा

“वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ।
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥”

हिंदू धर्मामध्ये संकष्ट चतुर्थी हे अत्यंत महत्त्वाचे व्रत मानले जाते. प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थीला हे व्रत साजरे केले जाते. मात्र, ही चतुर्थी मंगळवारी आल्यास तिला अंगारकी संकष्ट चतुर्थी म्हणतात. ‘अंगारक’ म्हणजे मंगळ. मान्यतेनुसार, या दिवशी व्रत केल्यास विशेष पुण्य लाभते आणि आयुष्यातील संकटांचा नाश होतो.

अंगारकी संकष्ट चतुर्थी 2025: तारीख व वेळ

  • तिथी प्रारंभ: मंगळवार, 12 ऑगस्ट 2025 सकाळी 8:40.
  • तिथी समाप्त: बुधवार, 13 ऑगस्ट 2025 सकाळी 6:36.
  • चंद्रोदयाची वेळ (मुंबई/ठाणे): रात्री 9:17

श्री गणेश पूजन साहित्य

पूजेसाठी खालील साहित्याचा समावेश करावा:
श्रीफळ, हळद, कुंकू, गुलाल, दुर्वा, जास्वंदाची फुले, शेंदूर, चंदन, रक्तचंदन, कापूर, अष्टगंध, अक्षता, उदबत्ती, धूप, समई, निरांजने, फुले, फळे, नैवेद्य.

पंचामृत: दूध, दही, तूप, मध आणि साखर – हे पाच पदार्थ एकत्र करून तयार केलेला पेय आरोग्यासाठीही लाभदायी मानला जातो.

पूजा विधी (Ganesh Puja Rituals)

  • पहाटे स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे.
  • दिवसभर उपवास व संकल्प करावा.
  • धातूच्या श्रीगणेश मूर्तीचा प्रथम जलाभिषेक आणि नंतर पंचामृताने अभिषेक करावा.
  • अभिषेकावेळी गणपती मंत्राचा 108 वेळा जप करावा.
  • श्रीगणपतीस्तोत्र, अथर्वशीर्ष किंवा संकष्टनाशन स्तोत्र पठण करावे.
  • चंद्रोदयाच्या वेळी धूप, दीप, फुले व नैवेद्य अर्पण करून पूजा करावी.
  • चंद्रदर्शन घेऊन अर्घ्य अर्पण करून उपवास सोडावा.

व्रताचे लाभ (Angaraki Sankashti Chaturthi Vrat Benefits)

  • श्री गणेशाची कृपादृष्टी प्राप्त होते.
  • जीवनातील संकटे, अडथळे व ग्रहदोष दूर होतात.
  • आरोग्य, समृद्धी व मानसिक शांतता मिळते.